शेवगाव : तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील शेतकरी नशिर बाबूलाल शेख यांच्या बैलगाडीवर वीजवाहक तार पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या बैलगाडीत शेतकऱ्यासह त्याची पत्नी, मुलगीही होती. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून शेतकऱ्याचे कुटुंब वाचले. मात्र, यात बैलाचा जीव गेला.
नशिर बाबूलाल शेख यांनी एक महिन्यापूर्वी शेतीकामासाठी बैलाची खरेदी केली होती. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने, शेेेख यांनी जवळच्या लोकांकडून उसने पैसे घेऊन बैल घेतले होते. दैनंदिन शेतातील काम आटोपून ते आपल्या कुटुंबासमवेत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बैलगाडी जुंपून घराकडे निघाले असताना, अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाजवळून गेलेली विद्युत तार तुटून बैलाच्या अंगावर पडली. यात विजेचा धक्का बसून क्षणार्धात बैल जमिनीवर कोसळला. बैलगाडीमधील नशिर शेख व त्यांची पत्नी रुकसाना शेख, मुलगी रिजवाना शेख यांनी सावधानता बाळगून बैलगाडीतून खाली उड्या मारल्या. मात्र, ते बैलाला वाचवू शकले नाहीत. याची माहितीची समजताच, घटनास्थळी शिवाजी गायकवाड, विकास केसभट, दिगंबर केसभट, राम केसभट, अमोल केसभट, सुरेंद्र केसभट, सुंदर कारंडे, परशराम दुधडमल, विकास कानडे, बशीर शेख, नितीन केसभट, अजय केसभट, भैय्या केसभट, हसन शेख, अविनाश बोरुडे, महादेव गायकवाड हे पोहोचले. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन वीजपुरवठा खंडित केला. शेख यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.