अहमदनगर : तांत्रिक कामे सुकर व्हावीत म्हणून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्या नवनवीन ॲप्लिकेशन उपलब्ध करून देत आहेत. सायबर गुन्हेगार मात्र या ॲपचा गैरवापर करून लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत आहेत. गेल्या चार महिन्यांत एनीडेस्क आणि क्विक सपोर्ट ॲपचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्यातील तब्बल २८ जणांना १४ लाख ८४ हजार ५९ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
त्वरित लोण हवे आहे का, गेलेले पैसे रिफंड देेणे, कॅशबॅक, सीमकार्ड अपडेट करणे असे आमिष सांगून सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. तर कधी थेट एसएमएसद्वारे लिंग पाठवून हे ॲप डाऊनलोड केल्यास पाच ते दहा हजार रुपयांचा बोनस मिळणार असेही आमिष दाखविले जाते. बहुतांशी जण कुठलीही माहिती न घेता आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप डाऊनलोड करतात. काही ॲप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्या बँकेचा ॲक्सेस त्यांना देणे असे असते. मात्र ही बाब समजून न घेतल्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
---------------------
मोबाईल, संगणकाची स्क्रिन शेअर होते
सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवरील ॲप डाऊनलोड केल्यास मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकाची लिंक थेट शेअर होते. त्यामुळे आपण मोबाईलवर जी काही प्रक्रिया करतो ते सर्व गुन्हेगारांना दिसते. बहुतांशी जण बँकांचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मोबाईलमधील पासवर्ड सहज मिळतात.
-----------------------------
यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता
केस-१
नगर शहरातील एका उच्चशिक्षित नोकरदारास १२ जुलै एका अनोळखी व्यक्तीने फोन करून जिओ प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगत मोबाईलमध्ये एनी डेस्क हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते ॲप डाऊनलोड होताच तक्रारदाराच्या खात्यातून १ लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------
केस-२
तीन महिन्यांपूर्वी संगमनेर येथील एका तरुणास झटपट लोणबाबत एसएमएस आला. तरुणाने ती लिंक ओपन करून पुढील प्रक्रिया करताच त्याच्या बँक खात्यातील ७ हजार रुपये गायब झाले. ॲप डाऊनलोड करताना त्यातील सूचना न वाचताच प्रक्रिया केल्याने पैसे जातात.
--------------------
एसएमएस अथवा कुणी फोन करून कुठलेही ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले तर ते करू नये. कामानिमित्त ॲप डाऊनलोड करत असाल तर त्याच्या संदर्भातील येणाऱ्या सूचना आधी वाचाव्यात. आपली वैयक्तिक माहिती कुणालाही सांगू नये.
- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन