सोनई : महाराष्ट्र बँकेच्या माका येथील शाखेत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार करणारा लेखापाल शिवाजी उत्तम भवार याला सोनई पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले. भवार कारमधून पुण्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले. भवार याने गेल्या वर्षभराच्या कालावधीत सव्वा कोटींचा अपहार केला. यासंदर्भात महाराष्ट्र बँकेच्या माका शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत कोणीही या प्रकाराविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही़ याविषयी आम्हाला काहीही माहिती देता येणार नाही, नगरच्या मुख्य शाखेतून माहिती घ्या, असा सल्ला शाखेतील अधिकाऱ्यांनी दिला़ दरम्यान, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर टोलनाका (धनगरवाडी) येथे सापळा लावून भवारला अटक केली. वर्षभरात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भवारला या प्रकरणात आणखी कोणाकोणाची मदत मिळाली, वर्षभर सुरू असलेला हा घोटाळा शाखा व्यवस्थापकांच्या लक्षात कसा आला नाही, महाराष्ट्र बँकेच्या माका येथील शाखेचे अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या अपहारात हात आहे का? याचाही पोलीस आता शोध घेत आहेत़ दरम्यान, भवार याने बँकेची नोकरी करीत असताना गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी समृद्धी मार्केटिंग हा साखळी पद्धतीचा व्यवसाय सुरु केला होता. साडी आणि काही जीवनावश्यक वस्तू या व्यवसायातून त्याने देवू केल्या होत्या. या व्यवसायातून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. मात्र, पैशांची जास्त हाव सुटल्याने त्याने बँक खातेदारांच्या खात्यातील पैसे हडप करण्याचा सपाटा लावला होता. भवार याने व्हाऊचर फाडताना, काही रक्कम स्वत:च्या खिशात टाकताना, तसेच भवारच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याने पोलिसांच्या संशयात भर पडली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. शनिवारी त्याला नेवासा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांनी सांगितले.(वार्ताहर)
बँकेतील घोटाळेबाज लेखापाल जेरबंद
By admin | Updated: May 13, 2016 23:59 IST