Kanifnath Yatra : तिसगाव (जि. अहिल्यानगर) : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच, याबाबत ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मढी येथे शनिवारी (दि.२२) झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर सोमवारी मुस्लीम समाजाचे शन्नो पठाण, चाँद मणियार, फिरोज शेख, उबेद आतार, इसुब शेख, आसीफ शेख, नासीरभाई शेख, नवाब पठाण, परवेझ मणियार यांच्यासह मढीच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली.
मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकाने लावण्यास बंदी केल्याचा ठराव करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. मढी यात्रा ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची आहे. ही परंपरा सातशे वर्षांची आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला बाधा आणलेली आहे. हे कृत्य करणारे जे आहेत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी, मागणी केली आहे.
ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य - गटविकास अधिकारीमढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसते. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक व ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब समिती नोंदवील. ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठविला जाईल, असे पाथर्डी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअहिल्यानगर : मढीच्या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याबाबतचा बेकायदेशीर ठराव मढी ग्रामपंचायतने केला. हा ठराव करणारे सरपंच व प्रशासकीय सेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे. मढीची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून लोक येथे येतात. मात्र, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याचा घटनाबाह्य ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे हा ठराव करणारे सरपंच, ग्रामसेवक व प्रशासकीय सेवकांवर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे