बोठे याचा जिल्हा न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने वकिलामार्फत ३१ डिसेंबर रोजी खंडपीठात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान सोमवारी बोठे याच्यावतीने ॲड. संतोष जाधवर यांनी तर सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. रश्मी गौर व फिर्यादी यांच्यावतीने ॲड. दत्तात्रय मरकड यांनी युक्तिवाद केला. ॲड. गौर व ॲड. मरकड यांनी आरोपी पक्षाचे मुद्दे खोडून काढत हत्याकांडात बोठे याच्या सहभागाचे पुरावे सादर केले. यामध्ये बोठे याने हत्येच्या घटनेदरम्यान आरोपी असलेला सागर भिंगारदिवे याला व मयत रेखा जरे यांना केलेल्या कॉलचा सीडीआर, पैशांच्या देवाणघेवाणीचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, जरे याच्या घरातून बोठे याच्याबाबत मिळालेले पत्र तसेच पोलिसांना मिळालेल्या पेनड्राईव्हमध्ये बोठे हा जरे यांना देत असलेल्या धमकीचे संभाषण. आदी पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद करत बोठे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोठे याने दिलेली पैशांची बॅग भिंगारदिवेच्या घरात सापडली
बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली. भिंगारिदेवे याने ही सुपारी आदित्य चौळके याला दिली तर चोळके याने ज्ञानेश्वर शिंदे आणि फिरोज शेख या मारेकऱ्यांच्या माध्यमातून ३० नोव्हेंबर रोजी जरे यांची हत्या केली. या घटनेच्या दरम्यान बोठे याने भिंगारदिवे याला सुपारीचे पैसे एका बॅगमध्ये दिले. बोठे काम करत असलेल्या कार्यालय परिसरातच या पैशांची देवाणघेवाण झाली. बोठे याने दिलेली बॅग पोलिसांनी सागर भिंगारदिवे याच्या घरातून जप्त केली आहे. या पैशांच्या देवाणघेवाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान पोलिसांना मिळाले असल्याचे सरकारी पक्षाने औरंगाबाद खंडपीठात सुनावणीदरम्यान सांगितले आहे.
बोठे सापडणार कधी
जरे हत्याकांडातील सूत्रधार बोठे गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे. सर्वत्र शोध घेऊनही तो पोलिसांना सापडेला नाही. बोठे याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी मयत रेखा जरे यांच्या मुलाने उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. दरम्यान मयत जरे कुटुंबीयांचे वकील ॲड. एस.ए. पटेकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. बोठे व त्याच्या हितचिंतकापासून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना मात्र अद्यापपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही.