पाथर्डी (अहमदनगर) : आयुषी नितीन खेडकर हिने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश असून ती जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे.
डॉ. नितीन खेडकर व डॉ. मनीषा खेडकर यांची आयुषी ही कन्या आहे. सध्या ती बेंगलोर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तिने फायटर पायलटची परीक्षा दिली. त्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशातून ६१ जणांची निवड झाली. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे.
आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. नंतर बीटेक करण्यासाठी ती चेन्नई येथे गेली होती. याच काळात तिने गुवाहाटी येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. नोकरी करीत असतानाच तिने भारतीय सेवेतील प्रवेशाच्या परीक्षेसाठी अथक परिश्रम घेतले. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तिची एकाच वेळी नौसेना व वायू सेनेत निवड झाली. परंतु, देशसेवा करण्याचा तिचा मानस असल्याने तिने फायटर पायलट होणे पसंत केले. येत्या १ सप्टेंबरला ती हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.
---
हमारी छोरीया भी छोरोसे कम नही..
आयुषी हिची निवड झाल्यानंतर माजी मंत्री पंकज मुंडे यांनी ‘हमारी छोरीया भी छोरोसे कम नही’, असे ट्वीट करीत तिचे अभिनंदन केले. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
----
पाथर्डीत आज सन्मान..
आयुषीची निवड झाल्याबद्दल शनिवारी (दि.२१) सकाळी पाथर्डीतील संस्कार भवन येथे माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. तसेच दुपारी खरेदी-विक्री संघाच्या आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते व आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत तिचा सन्मान होणार आहे.
-----
२० आयुषी खेडकर