भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य नंदू वाघमारे, आखतवाडेचे सरपंच बाळासाहेब बडे. हरिभाऊ ऊगले आदीसह संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्राला कुलूप लावून तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या.
यावेळी बाळासाहेब सोनवणे म्हणाले, उसासंदर्भात चौकशी करण्यासाठी शेतकरी गेले असता, उसाच्या नोंदी रजिस्टरमध्ये खाडाखोड, नोंद बुक हरविले, स्लिप बुक हरवले, अशी उत्तरे येथील कर्मचारी, अधिकारी देत आहेत. ऊसतोडणीसाठी अधिकारी, टोळी, मुकादम गावपुढारी, ऊस वाहतूक करणारा चालक, मालक यांच्याकडून अरेरावी, दडपशाहीची भाषा वापरली जाते.
....
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
यावेळी काही शेतकऱ्यांनी टोळी ऊस तोडतांना दहा हजार रुपये मागते तर ऊस खालून, वरून चार-चार कांड्या सोडून तोडला जातो. परिणामी, उसाचे वजन कमी भरून त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. मात्र, वाढ्याला चार-पाच उसाचे कांडे ठेवल्याने मजुरांना वाढ्याचे पैसे चांगले मिळतात. वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकांची जावयांपेक्षा अधिक ठेप ठेवावी लागते, वरून दोन हजार द्यावे लागत आहेत, तर मुकादम पाच तर स्लिप मास्तर दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याच्या आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.