पारनेर : वाडेगव्हाण येथील दरोडा व वृध्देच्या खून प्रकरणात पकडलेला आरोपी संजय हसण्या भोसले (वय ३८, रा. वाघुंडे) याने रविवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यातील कोठडीत चादरीने गळफास घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्याचा फास काढल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. दरम्यान, त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात येत असून या प्रकाराने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.वाडेगव्हाण येथे शुक्रवारी तानवडे यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात पर्वतीबाई तानवडे या वृध्दा ठार झाल्या होत्या. याप्रकरणाचा तपास करताना सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी वाघुंडे येथील संजय हसण्या भोसले याच्यासह चार जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीही सुनावली होती. दरम्यान, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तुरुंगात सर्व आरोपी झोपल्यावर संजय हसण्या भोसले याने आपल्याकडील चादरीच्या सहाय्याने स्वत:चा गळा दाबून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. याची माहिती तेथील पोलीस सलीम शेख व ठाणे अंमलदार शेलार यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने तुरूंग उघडून संजयच्या गळयातील चादर काढून घेतली व तातडीने पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर पोलीस ठाण्यात आले. सर्व पोलिसांनी संजय भोसले यास पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नगर येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून आता त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:32 IST