संगमनेर : घराशेजारी राहणाऱ्या परदेशातील तरुणाने साडेचार वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास संगमनेरातील एका उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि.१४) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रोशन रमेश ददेल, असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, तो नेपाळमधील असल्याची माहिती आहे. पीडित बालिकेचे कुटुंब संगमनेरातील एका उपनगरात राहते. तिचे वडील शनिवारी कामावर गेले असता त्यांच्या पत्नीने फोन करत मुलीला त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे वडील घरी आले. घराशेजारी राहणाऱ्या रोशन चाचा याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मला घरी बोलावले होते. असे पीडित मुलीने तिच्या आई- वडिलांना सांगितले. बालिकेवर अत्याचार झाल्याचे तिच्या बोलण्यातून समजल्यानंतर तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, निकिता महाले, पोलीस नाईक विजय पवार, अविनाश बर्डे, विजय खाडे, अनिल कडलग, श्याम हासे यांनी रोशन ददेल याला पळून जाताना पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक महाले या अधिक तपास करीत आहेत.