अहमदनगर : पोतराज, जोगती, वाघे-मुरळी, आराधी, कलावंत आणि सिने कलावंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाद्ये वाजवून कलावंतांनी सरकारचा निषेध केला. कोरोना निर्बंधांमुळे कलाकारांचे जगणे कठीण झाले असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा या वेळी निषेधही करण्यात आला. मंगळवारी नगर येथील हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले.
एकपात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने सोसायट्यांच्या आवारात सादर होणाऱ्या कलांना तत्काळ परवानगी मिळावी. फी न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. असे प्रकार अनेक शाळांमध्ये घडत आहेत. संबंधित संस्थाचालकांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा. दीड वर्षात कमाई नसल्याने घरभाडे, वीजबिल भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित आस्थापनांनी रंगकर्मींना यात सवलत द्यावी. महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा. महाराष्ट्रातील विखुरलेल्या या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी, कलाकार पेन्शन योजनेच्या लाभासाठी अटींमध्ये शिथिलता आणावी, मानधनाच्या आकड्यात वाढ करावी, रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, या व अन्य मागण्यांचे निवेदन शासन दरबारी देण्यात आले आहे, असे भाऊसाहेब उडाणशिवे यांनी सांगितले.
या वेळी सिने अभिनेते प्रशांत नेटके, पोतराज मछिंद्र शेलार, सुनील चांदणे, विशाल वैरागर, अमित गाडे, सुभद्राबाई उल्हारे, मोहन गाडे, अमोल शेरकर आदी कलावंत सहभागी होते.
फोटो - १० पोतराज
नगरमधील कलावंतांच्या वतीने शासनाला जाग आणण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे मंगळवारी निदर्शने करण्यात आली. या वेळी पोतराज व माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, कलावंत प्रशांत नेटके यांच्यासह कलावंत.