पळवे : माध्यमिक शाळा संहितेनुसार कला शिक्षक हे विशेष शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या अर्हतेनुसार वेतनश्रेणी लागू असून जिल्ह्यातील एएम प्रशिक्षित कला शिक्षकांना विनाअट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर अशोक कडूस यांचा जिल्हा कला शिक्षक संघातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पठाडे, जिल्हा सचिव रवींद्र गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख कानिफनाथ गायकवाड, सदस्य बाबा भोर, आबासाहेब गाडे उपस्थित होते.
यावेळी कला शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. जिल्हा कला शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यासोबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतूद, वेतन आयोगातील तरतूद, उच्च न्यायालयाचे आदेश आदी कागदपत्रेही सादर करण्यात आली.
पठाडे म्हणाले, कला शिक्षक हा विशेष शिक्षक आहे. तशी तरतूद माध्यमिक शाळा संहितेतच आहे. वेळोवेळच्या शासन निर्णयातही ही बाब मान्य केली आहे. वेतन आयोगासह सर्व स्तरावर कला शिक्षकांना त्यांच्या अर्हतेनुसार वेतनश्रेणी मान्य केली आहे. बहुतांश कला शिक्षकांनी सेवांतर्गत आर्ट मास्टर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तरीही अद्याप जिल्ह्यातील अनेक कला शिक्षक पदवीधर वेतन श्रेणीपासून वंचित आहेत, असे सचिव रवींद्र गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले. शासन निर्णयानुसार कला विषयाला पुरेसा कार्यभार देणे, शाळांमधून कलात्मक उपक्रम राबविणे, शासकीय रेखाकला परीक्षांना प्राधान्य देणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. कला शिक्षकांच्या प्रश्नात लक्ष घालून एएम पदवीधर वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन कडूस यांनी दिले.