कोपरगाव : शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अनधिकृत गॅस विक्रेत्यांकडून गॅस सिलिंडरची बिनदिक्कतपणे विक्री करून ग्राहकांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक करत आहेत.
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील ग्राहकाने काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे घेतलेले सिलिंडर वापरत असताना गॅस अपघात झाला. सर्व गॅस उपकरणे जळाली, अजूनही सदर ग्राहक जळीत झालेली उपकरणे बदलून मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. सुरेगाव येथील एका ग्राहकाने अनधिकृतपणे इतर वाहनातून सिलिंडर घेतले. त्या सिलिंडरमध्ये गॅसऐवजी पाणी आढळले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर डिलिव्हरी अथवा गॅसविषयी कुठल्याही प्रकारची सेवा गॅस कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीकडूनच घ्यावी व आपल्या गॅस कार्डावर अधिकृत नोंद करून घ्यावी, असे आवाहन कोपरगाव गॅस कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.