नगर येथील न्यू लॉ महाविद्यालय, न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय व पुणे येथील विश्वकर्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या ५ दिवसांपासून पुणे विद्यापीठाला ई-मेलच्या माध्यमातून निकालात आलेल्या अडचणीबाबत तक्रार करीत आहे; परंतु त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नाही. हे विद्यार्थी तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जात आहेत. शून्य गुण, गैरहजर, एक किंवा दोन गुण असे ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालपत्रात आले आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षण प्रक्रिया, नोकरी अर्जही हे विद्यार्थी करू शकत नाही. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) चे विद्यार्थी प्रतिनिधिनी अॅड. सारस क्षेत्रे व इतर सहकारी यांनी यासंदर्भात कुलगुरू तसेच परीक्षा संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली व यासंदर्भात निवेदन दिले. त्यावर कुलगुरू आणि परीक्षा संचालक यांनी दोन दिवसांत सुधारित निकाल जाहीर करू, असे आश्वासन दिले.