शेवगाव : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत आनंद कॉलेजने बाजी मारली.
शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतर्गत महाविद्यालयातील वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला.
हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवापासून महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे ३७ वे वर्ष असून, स्पर्धेसाठी ‘ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य आहे किंवा नाही’ असा विषय होता. स्पर्धेचे उद्घाटन रुईछत्तीसी (ता. नगर) येथील जनता कला महविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाबर यांच्या हस्ते केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ज्वल संजय नरवडे, तर द्वितीय क्रमांक पवनकुमार जनार्दन गरड यानेे पटकाविला. दोघेही पाथर्डी येथील आनंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या
कोमल राजेंद्र नरके या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ अश्विनी तात्याराव (वाघवसे प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण), अनिकेत ढमाले (संरक्षणशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ) यांना पारितोषिक देण्यात आले. सांघिक करंडकाचे विजेते पाथर्डीचे आनंद कॉलेज ठरले. परीक्षक म्हणून डॉ. गजानन लोंढे, डॉ. जालिंदर कानडे, डॉ. रवींद्र वैद्य यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शेवगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन डॉ. वसंत शेंडगे, गोकुळ क्षीरसागर, संदीप मिरे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. किशोर कांबळे, डॉ. अनिता आढाव, प्रा. आशा वडणे, राहुल ताके, राहुल गंडे, गहिनीनाथ शेळके, मीनाक्षी चक्रे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. सोपान नवथर व अपर्णा वाघ यांनी केले. डॉ. छाया भालशंकर यांनी आभार मानले.
---
०६ शेवगाव वादविवाद
शेवगाव येथील वादविवाद स्पर्धेतील सांघिक करंडक पाथर्डीच्या आनंद कॉलेजने पटकाविला.