अहमदनगर : मनुष्यबळाअभावी महापालिकेची कर वसुली थंडावली असतानाच महसूलने अकृषक कर वसुलीची जबाबदारीही पालिकेकडे सोपविली आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीबरोबर आता पालिकेला अकृषक करही वसूल करावा लागणार आहे.
उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी महापालिका अकृषक कर वसूल करण्याबाबत कळविले आहे. सन २००९ पासूनचा अकृषक कर वसूल करण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या वसुली विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मालमत्ताधारकाचे नाव, क्षेत्रफळ, आकार यासह अन्य बाबींचा समावेश असलेली यादी महापालिकेला नुकतीच प्राप्त झाली आहे. महापालिकेच्या बिलात घरपट्टी, पाणीपट्टी वृक्षकर यांसह अन्य करांचा समावेश असतो. त्यात अकृषक कराचा समावेश केला जाणार आहे. परंतु, महापालिकेने कर वसुलीसाठी सॉप्टवेअर विकसित केलेले आहे. त्यामुळे अकृषक कराचा याच बिलात समावेश करावा, की स्वतंत्र आकारणी करावी, याबाबत वसुली विभाग संभ्रमात आहे. मनपाच्या बिलात समावेश करायचा झाल्यास संगणक प्रणालीमध्ये बदल करावा लागेल. हा बदल करण्यासाठी संपूर्ण संगणक प्रणाली बदलावी लागणार आहे.त्यात महापालिकेला एकूण अकृषक कराच्या ५ टक्के इतकी रक्कम मिळणार आहे.
....
- जिल्हा प्रशासनाकडून अकृषक कर वसुलीचा आदेश देण्यात आलेला आहे. याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. अकृषक कर आकारणी स्वतंत्र करावी, की महापालिकेच्या बिलात समावेश करायचा, याबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.
- गमाजी झिने, कर मूल्य निर्धारण अधिकारी, महापालिका