नेवासा : विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा.शिरसगाव, ता.नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर नाबदे हा पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे समजते. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पोटे यांनी फिर्याद दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नेवासा शहरात दोन ठिकाणी कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सकाळी ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रशिक्षणसाठी आलेला कर्मचारी नंदकिशोर नाबदे हा प्रशिक्षण सुरू असताना दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घालू लागला. नाबदे यांच्या गोंधळामुळे इतर अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षणात अडचण निर्माण होत असल्याने तहसीलदार रूपेश सुराणा यांनी पोलिसांना बोलावून तळीराम नाबदे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत दाते यांच्यासह आलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते, प्रीतम मोढवे व पोटे यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने नाबदे विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहेत.
दारू पिऊन धिंगाणा घालणा-या निवडणूक कर्मचा-यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:49 IST