कोपरगाव : ग्रामीण दळणवळणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या बसेसचे संपूर्ण राज्यभर जाळे पसरलेले आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचा एसटी महामंडळावर देखील परिमाण झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, अद्यापही कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बसेस बंदच असल्याने ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसेस सुरु व्हाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गाव आहेत. यापैकी बहुतांश गावात कोरोनापूर्वी एसटी बसच्या ६३२ फेऱ्यातून दररोज ४१ हजार ८०० किलोमीटर अंतर कापले जात होते. त्यातही १६ ते १७ बसेस या दररोज काही गावामध्ये मुक्कामी जात होत्या. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याने गावातील विविध पेन्शनधारक, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय उपचारासाठी कोपरगाव शहरात जाणारे नागरिक, शेतकरी, कष्टकरी, ज्यांच्याकडे स्वतःचे साधन नाहीत अशा नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे.
............
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल !
कोपरगाव आगारातून सध्या फक्त तालुका ते इतर तालुका व जिल्हा अशाच बस सुरु आहेत. या सर्वच गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने फुल्ल होत आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात एकही बस सुरु नाहीत.
..........मी
मी शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मला पेन्शन काढण्यापासून तर वैद्यकीय उपचारासाठी कोपरगाव येथे जावे लागते. त्यासाठी महामंडळाची एसटी खूप चांगला पर्याय होता. परंतु, गेल्या दीड वर्षात बस बंद असल्याने खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे बस सुरु व्हावी एवढीच अपेक्षा आहे.
- भीमराव आहेर, प्रवाशी
.........
मी ज्येष्ठ नागरिक असून कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत ग्रामीण भागातील बस बंद असल्याने कोपरगाव शहरात जाण्यासाठी खूप गैरसोय होत आहे.
- तुकाराम मोरे, प्रवासी
.......
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवासी पासेस बंद आहेत. तसेच ग्रामीण भागात बसला प्रवासी मिळत नसल्याने बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
- अभिजित चौधरी, आगार व्यवस्थापक, कोपरगाव
........................
स्टार ११२१