अहमदनगर : नगर शहरासह पाथर्डी, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड तालुक्यात रात्री नऊ वाजेच्या सुमारास अवकाळीच्या सरी बरसल्या़ या पावसाने उकाडा कमी होऊन वातावरणातील गारवा वाढला़ रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता़ नगर शहरातील सावेडी उपनगरात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या़ अक्षय तृतीयेची खरेदी करण्यासाठी नागरिक सकाळी घराबाहेर पडले होते़ अचानक आलेल्या पावसाने पथारीवाल्यांची तारांबळ उडाली़ दिवसभर कडाक्याचे ऊन होते़ दुपारी चांगलाच उकाडा वाढला़ सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले़ अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली़ या परिसरात २० मि़ मी़ पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे़ दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर शहरातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या़ त्याचबरोबर पाथर्डी, राहुरी, पारनेर तालुक्यातील काही भागात पाऊस पडला़ येत्या २० मे नंतर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे़ परंतु त्यापूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे़ पावसाचा दुसऱ्या दिवशीही मुक्काम होता़ त्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून, गारवा अचानक वाढला आहे़ पावसाची चाहूल लागल्याने बळीराजा सुखावला आहे़ शेतीच्या मशागतीला या पावसाने वेग येणार आहे़
अवकाळीच्या सरी बरसल्या
By admin | Updated: May 9, 2016 23:46 IST