लोकमत आॅनलाईनअहमदनगर, दि. 14 - पारनेर, श्रीरामपूर, अकोले, कर्जत पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी चुरस होती. कर्जत, श्रीरामपूरमध्ये चिठ्ठीद्वारे पदाधिकारी निवड झाली. अकोल्यात भाजप-शिवसेनेत सत्ता स्पर्धेतून दंगल झाली. अखेर राष्ट्रवादीने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याने अकोले पंचायत समितीची सभापती, उपसभापती पदे सेनेला मिळाली. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी जास्त जागा मिळविलेल्या भाजपला एकाकी पाडीत सत्ता पदांपासून दूर ठेवण्याची यशस्वी खेळी केली. अकोलेत शिवसेना-भाजपमध्ये राडा झाल्याने तणाव निर्माण होऊन पोलिसांना लाठीमार करावा लागला. जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष आव्हाड व उपसभापतीपदी राजश्री मोरे यांची बिनविरोध निवड झाली. पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या चंद्रकला खेडकर व उपसभापतीपदी विष्णूपंत अकोलकर अकोले पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या रंजना मेंगाळ सभापती व उपसभापतीपदी मारुती मेंगाळ यांची निवड झाली. माजी मंत्री मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला असलेल्या अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देऊन जास्त जागा मिळविलेल्या भाजपला एकाकी पाडीत सत्तेपासून दूर ठेवले.संगमनेरच्या सभापतीपदी काँग्रेसच्या निशा कोकणे व उपसभापतीपदी नवनाथ अरगडे यांची बिनविरोध निवड झाली. पारनेरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसची युती होऊन काँग्रेसचे राहूल नंदकुमार झावरे बिनविरोध सभापती बनले. राष्ट्रवादीचे दीपक पवार दोन मतांनी उपसभापतीपदी निवडून आले. आमदार सेनेचे असताना अनेक वर्षांच्या कालखंडानंतर जामखेडच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष आव्हाड व उपसभापतीपदी राजश्री मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राहुरीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा ओहोळ व उपसभापतीपदी रवींद्र आढाव यांची बिनविरोध निवड झाली. कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अनुसया होन व उपसभापतीपदी अनिल कदम यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राहाता पंचायत समिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदार संघात येते. त्यांच्या या बालेकिल्ल्यात राहाता पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या हिराबाई कातोरे सभापतीपदी तर बबलू म्हस्के यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पुष्पा शेळके व उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रशांत बुद्विवंत यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली.नगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड बिनविरोध झाली. दोन्ही पदे शिवसेनेने मिळविली. सभापतीपदी रामदास भोर व उपसभापतीपदी कांताबाई कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदाचे गाजर दाखवून महाआघाडीत फूट पाडण्यात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले अयशस्वी ठरले. बिनविरोध निवडीमुळे महाआघाडी एकसंघ राहिली. श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये एकूण आठ सदस्यांपैकी प्रत्येकी चार जागा काँग्रेस व महाआघाडीस मिळालेल्या आहेत. चिठ्ठीद्वारे महाआघाडीचे दीपक पटारे सभापतीपदी व उपसभापतीपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड झाली. शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र घुले यांचे चिरंजीव क्षितीज व उपसभापतीपदी शिवाजी नेमाने यांची निवड झाली. घुले हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे पुतणे आहेत. श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे पुरुषोत्तम लगड व उपसभापतीपदी प्रतिभा झिटे यांची बिनविरोध निवड झाली.नेवासा सभापतीपदी शेतकरी क्रांती पक्षाच्या सुनीता गडाख व उपसभापतीपदी राजनंदिनी मंडलिक यांची निवड झाली. कुठे कोणत्या पक्षाचे सभापती?जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जतमध्ये भाजप, शेवगाव, कोपरगाव, राहुरीत राष्ट्रवादी, पारनेर, राहाता व संगमनेरमध्ये काँग्रेस तर अकोले व नगर पंचायत समितीचे सभापतीपद शिवसेनेस मिळाले. श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या महाआघाडीचे दीपक पटारे व बाळासाहेब तोरणे यांना चिठ्ठीने साथ दिल्याने ते सभापती व उपसभापती झाले. नेवाशात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता सभापती बनल्या. गडाखांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीली सोडचिठ्ठी देत शेतकरी क्रांती पक्षातर्फे ही निवडणूक लढविली होती.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अकोलेत सेना सत्तेत
By admin | Updated: March 14, 2017 18:10 IST