बाळकृष्ण पुरोहितभेंडा : साखर उद्योगात नेहमी नवीन बदल होताना दिसतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर कारखानादारीत होतो. परंतु वषार्नुवर्षे चालत आलेल्या सांकेतिक भाषेचा वापर साखर कारखान्यात चांगल्या पध्दतीने होतो. त्याला वेगळा ठोस पर्याय अजूनही उपलब्ध झालेला नाही.भ्रमणध्वनी, वॉकी टॉकी असे संवादाची साधने उपलब्ध आहेत. परंतु भ्रमणध्वनीचा आवाज कारखान्यात व्यवस्थित ऐकू येत नाही. वॉकी टॉकी संच महागडे असल्याने कारखाना व्यवस्थापन सर्वांना देऊ शकत नाही. यामुळे सांकेतिक भाषेचा वापर करुन कारखान्यातील कर्मचारी एकमेकांशी संवाद साधून काम करतात.साखर कारखान्यात वाफेचा व निर्वात पोकळीचा आवाज सातत्याने होतो. शिवाय यंत्रसामुग्रीचा आवाज असतो. यामध्ये कर्मचारी शिट्टी वाजवून ज्याच्याशी काम आहे, त्याला इशारा करुन सांगतात. झडप चालू करणे, बंद करणे, वाफेचा दाब वाढविणे, वाफ बाहेर सोडणे, गव्हाण बंद करणे, चालू करणे, सांधाता, जोडारी, तारतंत्री यांना बोलावणे. एखादे यंत्र बंद पडले तर चालू करणे. पाणी किंवा इतर पदार्थाचे तापमान किती आहे, असे बरेचसे संवाद या माध्यमातून साधले जातात.सांकेतिक भाषेसाठी कराव्या लागणा-या इशा-याची नोंद कोठेही लिखीत स्वरूपात सापडत नाही. बदलत्या काळात इशारे बदलत चालले हे मात्र खरे आहे. नवीन आलेले कर्मचारी जुन्या सहकार-याकडून या सांकेतिक भाषेचे धडे शिकतात. आजही साखर कारखानदारीत सांकेतिक भाषेचा वापर सर्रास होतो.
अहमदनगर जिल्ह्यात साखर कारखानदारीत चालतो सांकेतिक भाषेतून संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:29 IST