संचालकांनी दिलेले राजीनामे मंजूर केले नाहीत व अगस्ती गळीत हंगाम सुरू करण्यास अडचण येणार नाही असे कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले.
अगस्ती साखर कारखाना कार्यस्थळी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन संचालकांचे राजीनामे नामंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी संचालक प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, गुलाब शेवाळे, रामनाथ वाकचौरे, कचरू पाटील शेेेटे, अशोक देशमुख, महेश नवले, सुनील दातीर, अशोक आरोटे, मच्छिंद्र धुमाळ, भीमसेन ताजणे, दिलीप मंडलिक उपस्थित होते.
अगस्ती साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीची उलटसुलट चर्चा व संचालकांचे राजीनामे यातून गळीत हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने मळभ तयार झाले होते.
रविवारी आमदार डाॅ. लहामटे, डाॅ. अजित नवले यांच्या पुढाकाराने दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, कॉम्रेड कारभारी उगले, विनय सावंत यांच्यात बैठक होऊन अगस्ती साखर कारखान्याबाबत तीन महिने काही बोलायचे नाही, असा सकारात्मक निर्णय झाला, या निर्णयाचे उपाध्यक्ष गायकर यांनी स्वागत केले.
आमदार लहामटे व ज्येष्ठ नेते भांगरे यांनी तालुक्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री व संचालक मंडळाची सकारात्मक चर्चा घडवून आणल्याने कारखाना चालवण्यासाठी अडचणी तूर्त कमी झाल्या आहेत. आता संचालक स्वतःच्या मालमत्तेवर बोजा चढवून कारखान्यासाठी पतसंस्थेकडून कर्ज उभारणी करणार आहे. ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांचे देणे व त्यांना द्यावी लागणारी उचल हा प्रश्न मिटणार असल्याचे गायकर यांनी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील अगस्तीला मदत करणार आहेत.
..............
अगस्तीचा साखर उतारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या एफआरपी प्रमाणे जिल्ह्यात सर्वात अधिक ऊस पेमेंट देणारा हा कारखाना ठरला आहे. ऊस उत्पादकांना २,२५० रूपये प्रती टन प्रमाणे पैसे अदा केले आहे. उर्वरित २०० रुपये दिवाळी पूर्वी दिले जाणार आहे. कारखाना गळीत हंगाम वेळेत सुुुरळीत सुरू होईल.
- सीताराम गायकर, उपााध्यक्ष