महिलेची तक्रार : भरपाईची मागणी
श्रीरामपूर : महालगाव मालुंजा (ता. राहुरी) येथील माधुरी राहुल पवार या शेतकरी महिलेच्या शेतजमिनीवर एका तेल कंपनीने विनापरवानगी घातक द्रव्य सोडले आहे, अशी तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तेल कंपनीने पाईपलाईनच्या खोदकामासाठी आपली २१ गुंठे जागा ताब्यात घेतली. त्यासाठी २ लाख १० हजार रुपयांचा मोबदला दिला. मात्र, दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी कंपनीने मोठ्या वाहनांची वाहतूक केली. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. खोदकामावेळी दगड फोडण्यासाठी घातक द्रव्याचा वापर केला. त्यातून शेतपिके उद्धवस्त झाली. कंपनीच्या ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसंमती घेतली नाही. त्याची भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आठ महिने उलटूनही भरपाई दिली नाही. शेतजमिनीजवळून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रात घातक द्रव्य पाझरले आहे. त्यातून मासे व इतर जलचर संकटात सापडल्याचे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई करून झालेली नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.