बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला.
मै राजराणी बोल रही हूँ. त्यावर गणेश म्हणाला, तुम कहा है, मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड वर्षानंतर बोलणे गणेशला आकाश ठेंगणे झाले.
समजलेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्यातील गौराठाणा पोलिस हद्दीतील राजराणी गणेश किरसकर ही तीस वर्षीय महिला आपली मुलगी सीमा हिला घरी सोडून दीड वर्षापासून घरातून गायब झाली. तिला एका ट्रक चालकाने महाराष्ट्रात आणले. गेल्या आठ दिवसांपासून तीन मांडवगण रोडवरील जंगल परिसरात फिरत होती. ती महिला भुकेने व्याकुळ झाली होती.
प्रहारचे नितीन रोही यांनी तिची विचारपूस केली. तिने आपल्या एका मैत्रीणीचा मोबाईल नंबर दिला. त्यामुळे पती गणेशशी संपर्क झाला. सचीन रोही यांनी गणेशला श्रीगोंद्याला येण्यासाठी दोन हजार रुपये आॅनलाईन पाठवले. विजय नवले, संपत कोठारे, हौसराव कोठारे, अक्षय कोठारे यांनी मदत केली.
या महिलेने व्याकुळ अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे दक्षचे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे यांची भेट घेऊन तिला ग्रामीण रुग्णालयात या महिलेची वैद्यकीय तपासणी करुन विकास तरटे, परिचारिका पुनम नेटके, प्रियंका नेटके, भारती काळे यांनी उपचार सुरू केले.
दोन दिवसात गणेश किरसकर हा श्रीगोंद्यात येणार आहे. त्यानंतर राजराणी व गणेश दांपत्याची भेट होणार आहे.