श्रीगोंदा : उत्तर प्रदेशातून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेली महिला सोमवारी श्रीगोंद्यात सापडली. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिची उत्तर प्रदेशात असलेल्या पतीशी ऑनलाइन भेट घडवून आणली. तिचा पती तिला घेऊन जाण्यासाठी श्रीगोंदा येथे येणार आहे.
राजराणी गणेश किरसकर असे त्या महिलेचे नाव आहे.
उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्यातील गौराठाणा पोलीस हद्दीतील राजराणी गणेश किरसकर ही तीसवर्षीय महिला मुलगी सीमा हिला घरी सोडून दीड वर्षापासून बेपत्ता होती. तिला एका ट्रक चालकाने महाराष्ट्रात आणले. गेल्या आठ दिवसांपासून तीन मांडवगण रस्त्यावरील जंगल परिसरात फिरत होती. ती महिला भुकेने व्याकूळ झाली होती.
प्रहार संघटनेचे नितीन रोही यांनी तिची विचारपूस केली. तिने रोही यांना एका मैत्रिणीचा मोबाइल नंबर दिला. त्यांनी त्या मैत्रिणीकडून महिलेचा पती गणेश किरसकर याचा मोबाइल क्रमांक घेऊन त्याला संपर्क केला. त्यांनी राजराणीचे गणेशशी मोबाइलद्वारे बोलणे करून दिले. यावेळी श्रीगोंद्याला येण्यासाठी गणेशकडे पुरेसे पैसे नसल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी रोही यांनी गणेशला श्रीगोंद्याला येण्यासाठी दोन हजार रुपये ऑनलाइन पाठविले. तो दोन दिवसांत येऊन पत्नीला घेऊन जाणार आहे.
यावेळी विजय नवले, संपत कोठारे, हौसराव कोठारे, अक्षय कोठारे यांनीही मदत केली. त्यानंतर महिलेला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी दक्षचे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे यांची भेट घेऊन तिला उपचार मिळवून दिले.