श्रीगोंदा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्याच दिवशी आमचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात यावेळी पवार भाकरी फिरवतील अशी अपेक्षा आहे. नागवडे घराण्यास यावेळी निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केला.बेलवंडी गटातील गावांमधील तलावांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडावे, जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार महेंद्र महाजन व कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना नागवडे यांनी दिले. त्यानंतर नागवडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागवडे म्हणाल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून आम्ही चार पावले मागे घेण्याचे धोरण घेतले. त्यामुळे श्रीगोंद्यात आघाडी मजबूत झाली आहे. आम्ही जनप्रवाहात राहिलो असून मागील विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे तिकीट मिळत असताना आम्ही नाकारले. लोकसभा निवडणुकीतही पवार कुटुंबीयांच्या शब्दाला मान दिला. पुढील विधानसभा निवडणुकीत नागवडे घराण्यास उमेदवारी देण्याबाबत पवार सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला.
त्यानंतरच राष्ट्रवादीत प्रवेश : अनुराधा नागवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:25 IST