सुपा : नगर-पुणे रस्त्यावरील दुभाजक अनधिकृतपणे रात्रीतून गायब करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान व अपघातास त्यांना जबाबदार धरणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
नगर-पुणे रस्त्यावरील वाहनांची वाढलेली गर्दी. त्यामुळे होणाऱ्या अपघातात वाढ झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने व टोल वसूल करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभ्यास केला. रस्त्यावरील दुभाजक अनेक ठिकाणी अनधिकृतपणे तोडल्याने तेथून अचानक रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना भरधाव वाहनांनी जोराची धडक बसत असल्याचे पुढे आले. रस्त्यालगत असणारे व्यावसायिक उद्योग, व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, ग्राहकांची सोय व्हावी, या उद्देशाने बिनदिक्कतपणे रात्रीतून दुभाजक तोडून गायब करतात. त्यातूनच अपघातात होतात.
यावर लक्ष देण्यासाठी असणाऱ्या यंत्रणेबाबत विचारता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सागर कोतकर म्हणाले, नगर-शिरूर असा ५६ किमी अंतराच्या टप्प्यात उद्योजक रात्रीतून हे काम करताना यंत्रणेच्या नजरेतून सुटून जातात. सकाळपर्यंत तेथील रस्ता मोकळा केला जातो व विचारणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी याना उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होतात.
आता मात्र दुरुस्ती करून तोडलेला भाग भरून काढताना संबंधितांना नोटीस दिली आहे. कोणी अनधिकृतपणे दुभाजक तोडले, तर शासकीय मालमत्तेचे नुकसान, अपघाताची जबाबदारी त्याच्यावर टाकून जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय दुभाजक तोडून जबाबदारी झटकली, तर दोन्ही बाजूंच्या व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याचे कोतकर यांनी सांगितले.
--
दुभाजक तोडणाऱ्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, असे गृहीत धरून पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. तेथे अपघात झाला, तर सर्व दोष त्या व्यक्तीचा म्हणून त्यास जबाबदार धरले जाईल.
- सागर कोतकर, सहायक अभियंता, सा. बां. वि.
---
आमच्या कार्यकक्षेतील रस्त्यावर विनाअपघात सुरळीत वाहतूक यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. चालकाला वाहने चालविताना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. यात दुभाजक तोडण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे अपघात घडतात. तरीही संबंधितांच्या सूचनेनुसार त्यांची दुरुस्ती केली जाते.
- भानुदास नारखडे, व्यवस्थापक, चेतक एंटरप्रायझेस
---
०८ पुणे रोड
नगर-पुणे रस्त्यावरील तोडलेल्या दुभाजकांच्या पुनर्भरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विश्वनाथ दिवटे, पोलीस अधिकारी, कर्मचारी.