अहमदनगर : कोविड रुग्णांकडून आकारलेली जास्तीची बिले परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगरमधील पाच बड्या रुग्णालयांना अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात एकही रुपया रुग्णांना परत न केल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोविड रुग्णांकडून जास्तीची बिले आकारण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जिल्हास्तरीय समितीने बिलांची तपासणी केली असता शहरातील १३ रुग्णालयांनी १ कोटी २० लाख रुपये अधिकचे आकारल्याचे समाेर आले होते. याबाबत महापालिकेने कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी वेळोवेळी रुग्णालय प्रतिनिधींची बैठक घेऊन जास्तीची बिले परत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ८ रुग्णालयांनी सुमारे २९ लाख रुपये परत रुग्णांना परत केले; परंतु उर्वरित ५ रुग्णालयांनी एक रुपयाही परत केला नाही. त्यामुळे त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात येण्याच्या आदेश आयुक्त गोरे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. आरोग्य विभागाकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यात येत असून, या रुग्णालयांना लवकरच अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे.
....
कोविड रुग्णांचे ९१ लाख अडकले
शहरासह जिल्ह्यातील सुमारे ७५० रुग्णांचे ९१ लाख रुपये रुग्णालयांकडे अडकले आहेत. रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून पैशांची मागणी महापालिकेकडे करत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांना वेळोवेळी कळविण्यात आले; परंतु वर्ष उलटून रुग्णालयांनी पैसे परत केलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांची पायपीट सुरू असून, रुग्णालयांना मुदतवाढ न देता कारवाई करण्यात येणार आहे. तशी नोटीस महापालिकेकडून रुग्णालयांना बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...................
कोविड रुग्णांकडून आकारण्यात आलेली अधिकची बिले परत करण्याबाबत रुग्णालयांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या. याबाबत अनेक बैठकाही झाल्या; परंतु रुग्णालयांनी जास्तीची बिले परत केली नसून, त्यांना यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. शहरातील पाच रुग्णालयांनी वर्षभरात एकही रुपया परत केला नाही. त्यामुळे या पाच रुग्णालयांना कारवाईची अंतिम नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
-शंकर गोरे, आयुक्त, महापालिका