अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असताना बाहेरून आलेल्या पाच जणांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचा अखेर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. न्यायालयाच्या पंचनाम्यानंतर पुणे येथे ससून रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदीक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२, रा. मुकुंदनगर) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ १५ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास त्याला मारहाण झाली होती. बिराजदार याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात २८ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. भिंगार ठाण्यातील दोन पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सादिक याला त्याच्या मुकुंदनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस सादिक याला शासकीय वाहनातून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. पोलिसांचे वाहन भिंगार नाल्याजवळ जाताच आरोपीवर इतर पाच जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केले, अशी तक्रार बिराजदार याच्या पत्नीने केली होती. त्यानंतर त्याच्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री ८च्या सुमारास बिराजदारचा मृत्यू झाला. त्यानंतर दवाखान्यात मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला होता.