अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भास्करराव गलांडे पाटील विद्यालयात हा प्रकार घडला. ग्रामपंचायत सदस्या संगीता नानासाहेब मांजरे यांच्या मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे शाळेतून काढण्यात आली. शाळा समितीचे अध्यक्ष व अशोक साखर कारखान्याचे संचालक सोपान पुंजाजी राऊत यांनी ही खासगी माहिती शाळेतून काढल्याचे मांजरे यांचे म्हणणे आहे. शाळेचे मुख्याध्यापक यांनीही घडलेल्या प्रकारास दुजोरा दिला आहे. राऊत यांनी मांजरे यांची परवानगी न घेताच त्यांच्या मुलांची बोनाफाईड प्रमाणपत्रे नेली. मांजरे यांचे आपण पाहुणे आहोत असे सांगून राऊत यांनी हा प्रकार केल्याचे मुख्याध्यापकांनी लेखी लिहून दिले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्या संगीता मांजरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग प्रमुखांकडे तक्रार केली आहे. शाळा समितीचे अध्यक्ष राऊत यांच्यावर कारवाई करावी अन्यथा २६ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राऊत हे आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करू शकतात. ते राजकीय वजन वापरून विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर दबाव टाकीत आहेत अशी भीती मांजरे यांनी व्यक्त केली आहे.
निवेदनाच्या प्रती रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील कार्यालयास पाठविण्यात आल्या आहेत.
---------