कोपरगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतीच राष्ट्रीय नवसंशोधन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री. ग. र. औताडे पाटील विद्यालयाच्या इयत्ता नववीतील आदित्य अशोक अहिरे याच्या ‘आम आदमी वॉटर हिटर’ या उपकरणाला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, या पारितोषिकाची २१ हजार रुपये रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य काकासाहेब गवळी यांनी दिली आहे.
या परीक्षेत संपूर्ण भारतातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटांतून एकूण १,९५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. भारतीय विज्ञान अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण समितीने आदित्य अहिरे यास आठवी ते दहावी राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले आहे. ऑनलाइन झालेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी अनुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, नॅशनल इनोव्हेशनचे डॉ. विपीन कुमार, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अयंगार उपस्थित होते. या उपकरणासाठी आदित्यला एस. व्ही. बागुल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब गवळी, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, पालक विद्यार्थी, ग्रामस्थ अशा सर्वच स्तरातून आदित्यचे कौतुक होत आहे.