आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या महसूलमंत्री पदाच्या काळात महसूल विभाग अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. याच बरोबरच विद्यार्थ्यांना शाळेतच ८० लाख दाखले देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे महसूल विभागाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महसूलमंत्री म्हणून काम करताना थोरात यांनी शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ यांच्या सोयीकरिता ऑनलाईन सातबारा, ई फेरफार, ई-मोजणी असे विविध उपक्रम राबविले. एकाच दिवसात ७२ हजार ७०० सातबारा डाउनलोड झाले असून, राज्य सरकारला २३ लाख रुपयांचा महसूल एका दिवसात प्राप्त झाला आहे. महाभूमी या संकेतस्थळावर सोमवारी आत्तापर्यंत उच्चांकी सेवा देण्यात आली. यापूर्वी एका दिवसात ६२ हजार उतारे डाउनलोड झाले होते. हा विक्रम आता मोडीत निघाला असून, राज्य सरकारच्या ऑनलाईन सातबारा सुविधेचा नागरिकांना मोठा फायदा होतो आहे.
एकाच दिवसात ७२ हजार ७०० सातबारा डाउनलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST