नेवासा : तालुक्यातील ११४ पैकी ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गावोगावी चर्चेचे फड रंगत आहेत. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने गावपुढाऱ्यांची मात्र अडचण झाली आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनई, कुकाणा, प्रवरासंगम, चांदा, सलाबतपूर, खरवंडी, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक, देवगाव, शनिशिंगणापूर,जेऊरहैबती, तेलकुडगाव, पिंप्रीशहाली या मोठ्या ग्रामपंचायतींसह अर्ध्या तालुक्यात वर्षाखेरीस निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे. पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जाणार असून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. गावागावांत राजकीय वातावरण तापू लागले असून ठिकठिकाणी चर्चेचे फड रंगत आहेत.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री शंकरराव गडाख गट व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटात चुरस पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी गावपातळीवरील आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकूण २०९ प्रभागांतून ५९१ सदस्य निवडले जाणार असून यात साधारणपणे एक लाख ३७ हजार ९८७ इतके मतदार आहेत. यामध्ये ७२ हजार ५९१ इतके पुरुष व ६५ हजार ३९६ महिला मतदारांचा समावेश आहे. या ५९ ग्रामपंचायतींत सात सदस्य असलेल्या सात, नऊ सदस्य असलेल्या बत्तीस, अकरा सदस्य असलेल्या अकरा, तेरा सदस्य असलेल्या चार, पंधरा सदस्य असलेल्या दोन तर सतरा सदस्य असलेल्या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
चौकट : या गावांत तापणार राजकारण
बाभूळखेडा, बाभूळवेढा-उस्थळ दुमाला, बहिरवाडी-धामोरी, बकूपिंपळगाव, बऱ्हाणपूर, बेल्हेकरवाडी, बेलपिंपळगाव, भालगाव, भेंडा बुद्रुक, बोरगाव-सुरेगाव-गंगापूर, चांदा, देवगाव, देवसडे, धनगरवाडी-नारायणवाडी, दिघी, गळनिंब, गेवराई, घोगरगाव, गोंडेगाव-म्हसले, गोणेगाव-इमामपूर, गोयेगव्हाण-पिंपरी शहाली, जळके बुद्रुक, जळके खुर्द, जेऊर, कारेगाव, खडके, खलाल पिंपरी-मडकी-मुरमे, खरवंडी, खेडलेपरमानंद, कुकाणा, लांडेवाडी, लोहगाव, मक्तापूर, माळेवाडी दुमाला, सुरेगाव तरफा दहीगाव-वरखेड, माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम, मांडेगव्हाण-मोरगव्हाण, मंगळापूर, म्हाळस पिंपळगाव, मोरयाचींचोरे, नजीक चिंचोली, नवीन चांदगाव, निंभारी, निपाणी निमगाव, पाचुंदे, पुनतगाव, रामडोह, रांजणगाव, सलाबतपूर, शनी शिंगणापूर, शिंगवे तुकाई, सोनई, सुलतानपूर, तरवडी, तेलकुडगाव, टोका-वाशिम, उस्थळखालसा, वाकडी, वांजोळी, वाटापूर.