अहमदनगर : पुणे, मुंबई येथे होणाऱ्या मॅरेथॉनच्या धर्तीवर नगर शहरात नगर रायझिंग फौंडेशन व शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्यावतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़ ही स्पर्धा ७ फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली़ महाराष्ट्र अमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन व जिल्हा अमॅच्युअर असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत असून, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे़ या स्पर्धेसाठी ३, ५, १० व २१ किलोमीटर अंतराचे गट तयार करण्यात आले आहे़ तसेच या वर्षी ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा गट असणार आहे़ ३ ते ५ किलोमीटर अंतराची स्पर्धा ही लोकांमध्ये पळण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेण्यात येणार आहे़ १० आणि २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत स्त्री व पुरुषांचे स्वतंत्र गट तयार करण्यात येणार असून, या दोन्ही गटातील स्त्री व पुरुष विजेत्यांना प्रत्येकी ३० हजार, २० हजार व १० हजार रुपयांच्या रोख बक्षिसांसह मेडल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे़ या स्पर्धेत ३-५ हजार स्पर्धक सहभागी होतील़ स्पर्धेचा मार्ग भुईकोट किल्ला ते चांदबिबी महाल असा असणार आहे़ अनुरोन इन्फ्रास्ट्रक्चर, नमोह इंडस्ट्रीज, तारडे हॉस्पिटल, डॉ़ सोनवणे कॅन्सर क्लिनीक येथे स्पर्धेची नाव नोंदणी करण्यात येत आहे़ तसेच नगर रायझिंग या संकेतस्थळावरही नाव नोंदणी सुरु असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले़ यावेळी नगर रायझिंग फौंडेशनचे सदस्य डॉ़ शाम तारडे, डॉ़ सतीश सोनवणे, अॅड़ गौरव मिरीकर, संयोजक संदीप जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
नगर मॅरेथॉनमध्ये धावणार ५ हजार स्पर्धक
By admin | Updated: December 17, 2015 23:38 IST