अहमदनगर : जिल्ह्यात संघटित गुन्हे करून कायदा अन् सुव्यवस्थेला वारंवार बाधा निर्माण करणाऱ्या सराईत टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. अवघ्या चार महिन्यांत ६ टोळ्यांमधील तब्बल ३६ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षांत काही संघटित गुन्हेगारांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. खून, दरोडे, जबरी चोरी, रस्ता लूट, प्राणघातक हल्ला, व्यावसायिकांना दमदाटी, दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणे, असे प्रकार सुरू होते. ही संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारींना आदेश दिले आहेत, तसेच सराईत टोळ्यांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार सहा टोळ्यांतील ३६ आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, आणखी काही टोळ्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही गेल्या सहा महिन्यांत हत्या, तस्करी, रस्ता लूट व कुख्यात दरोडेखोरांना गजाआड करत कडक कारवाई केली आहे.
.................
या टोळ्यांवर झाली कारवाई
भिंगारदिवे टोळी
प्रकाश दशरथ भिंगारदिवे (टोळीप्रमुख), संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे, विक्रम आनंदा गायाकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहेब सोपान आढाव, संदीप परशुराम वाघचौरे, अर्जुन सबाजी ठुबे, बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे, लॉरेन्स दोराई स्वामी या भिंगार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.
------------
कासार टोळी
विश्वजित रमेश कासार (टोळीप्रमुख), सुनील फक्कड आडसरे, शुभम बाळासाहेब लाेखंडे, सचिन भांमरे, इंद्रजित रमेश कासार, मयूर बापूसाहेब नाईक, भरत भिमाजी पवार, संतोष भाऊसाहेब धोत्रे, संकेत भाऊसाहेब भालसिंग यांचा समावेश असलेल्या या टोळीवर कारवाईचा प्रस्ताव नगर तालुका पोलीस ठाण्याने पाठविला होता.
----------------------
तांदळे टोळी
नयन राजेंद्र तांदळे (टोळीप्रमुख), विठ्ठल भाऊराव साळवे, अक्षय बाबासाहेब ठोंबरे, शाहुल अशोक पवार, अमोल छगन पोटे यांचा समावेश असलेल्या टोळीवरही सुपा पोलीस ठाण्याने कारवाईचा प्रस्ताव दिला होता.
-------------
कदम टोळी
एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या संदीप दिलीप कदम (टोळीप्रमुख), शशिकांत सावता चव्हाण, सोमनाथ रामदास खलाटे या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.
------------
भोसले टोळी
राहुल निर्वाश्या भोसले (टोळीप्रमुख), उरुस ज्ञानदेव चव्हाण, दगू बडूद भोसले, निवाश्या चंदर भोसले, पप्या मोतीलाल काळे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव नगर तालुका पोलीस ठाण्याने दिला होता.
-------
पठारे टोळी
नगर शहरातील विजय राजू पठारे (टोळीप्रमुख), अजय राजू पठारे, बंडू ऊर्फ सूरज साहेबराव साठे, अनिकेत विजू कुचेकर, प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे, अक्षय गोविंद शिरसाठ यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्याने कारवाईचा प्रस्ताव दिला होता.
----------------
जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टू-प्लस योजनेंतर्गत प्रभावी कामकाज सुरू आहे, तसेच मोक्का कायद्यांतर्गत सहा प्रस्तावांना विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यापैकी अप्पर पोलीस महासंचालक यांनी तीन टोळ्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली आहे. सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या काळात आणखी कडक कारवाई केली जाणार आहे.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक.
फोटो १८ मनोज पाटील