करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. वीजबिल थकल्याने ‘महावितरण’ ने योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय घेतल्याने या गावांवर ‘पाणी, पाणी’ करण्याची वेळ आली आहे. मिरी-तिसगाव नळ योजनेचे पांढरीचा पूल येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. येथे रोज पंधरा ते वीस टँकर भरले जातात. सध्या योजनाच बंद असल्याने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात विहिरींनी तळ गाठलेला असताना योजना बंद पडल्याने तिसगाव, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, लोहसर, भोसे,जोडमोहोज, राधोहिवरे या प्रमुख गावांसह २६ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे चाळीस कोटी खर्चून युती शासनाच्या कारकिर्दीत मिरी-तिसगाव योजना मार्गी लागली. योजना वरदान ठरल्याने या गावांचा टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. योजनेचे सुमारे पन्नास लाखांचे वीज बिल व पाणीपट्टी थकल्याने ‘महावितरण’ने योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रशासनाला आता या सर्व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. (वार्ताहर)
२६ गावांच्या घशाला कोरड
By admin | Updated: October 30, 2023 10:49 IST