केडगाव : नगर तालुक्यातील बु-हाणनगर व ४४ गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती साठी राज्य शासनाने खास बाब म्हणून २ कोटी ३ लाख ११ हजार निधी मंजूर केला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती रामदास भोर यांनी दिली.बु-हाणनगर व ४४ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना तालुक्यामध्ये सन २००९ पासून सुरू झाली असून सदर योजना सुरू झाल्यापासून अद्याप पर्यंत कोणताही निधी दुरूस्ती कामी प्राप्त झाला नसल्या कारणाने पाणी योजनेचे पंपिंग मशिनरी नादुरूस्त झालेली होती. तसेच सदर पाणी योजना सिमेंट पाईपलाईन मध्ये असल्याने ब-याच ठिकाणी विशेषत: निंबोडी भागामध्ये लष्करी हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू होती. या सर्व बाबीमुळे दुरूस्ती कामी निधीची आवश्यकता होती. सदर बाब लक्षात घेवून निधी मागणीचा प्रस्ताव पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून सदर प्रस्तावास महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी मंजूरी दिली आहे. मंजूरी मिळाल्याने पंपिंग मशिनरी दुरूस्त करणे, पाईपलाईन दुरूस्त करणे इत्यादी कामे करता येतील. याकामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बु-हाणनगर व ४४ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेकरीता २ कोटी ३ लाख ११ हजार निधी ऐन दुष्काळामध्ये मंजूर झाला असल्याचे सभापती भोर यांनी सांगितले.
बु-हाणनगर पाणी योजनेसाठी २ कोटी ३ लाख निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:54 IST