जामखेड : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त चोंडी येथे भगव्या ध्वजाची गावप्रदर्शना करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या राजवाड्यात शौर्यध्वज स्तंभ उभारण्यात आला. जामखेड येथील खर्डा चौकात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात १५१ जणांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी साध्या व पारंपरिक पद्धतीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मंगळवारी लोकमान्य शाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी १५१ शिवभक्तांनी रक्तदान केले. संध्याकाळी शिरकाई देवीचा जागर करून बुधवारी पहाटे ५ वाजता खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार रोहित पवार यांना निवेदन देण्यात आले.