अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे ५२ कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर नगर तालुक्यातील आठवड येथेही १५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पावठण्यात आले आहे. दरम्यान, मिडसांगवीच्या मृत कोंबड्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला की अन्य कारणामुळे हे स्पष्ट होणार आहे.
शेजारील बीड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग पसरला असल्याने व मिडसांगवी येथे ५२ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, मिडसांगवीच्या दहा किलोमीटर परिघात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील पोल्ट्री फार्म व कोंबड्यांची तपासणी पशुसंवर्धन विभागाने केली असून, कोंबड्यांची विक्री व वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
दरम्यान, श्रीगोंदा, जामखेड व नगर तालुक्यात एकूण सहा वन्यपक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्याच्या नमुन्याचा अहवालही अद्याप प्राप्त झालेला नाही. बीड जिल्ह्यातील बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील अहवालाकडे लक्ष लागले आहे.