- बा. भो. शास्त्री‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो. ज्ञानेश्वरीत विवेकाचीही लावणी झाली. त्यात साहित्य पिकलं. ते कसदार व टिकाऊ आहे. देहाला अन्न व बुद्धीला विचार लागतात. बुद्ध, महावीर पैगंबर, श्रीकृष्ण, व्यासांचा देह साडेतीन हातांचाच, पण त्यांनी जगभर विवेकाचे मळे निर्माण केले. म्हणून स्वामी माणसाचं कौतुक करतात आणि हळूच एक सूचना करतात. सगळं उत्पन्न कर बाबा, पण भय पेरू नकोस. कारण भयात मिळालेलंं सुख रूचत नाही, पचत नाही व अभयात दु:खालाही सुखाची चव येते. अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याचा दाता माणसाशिवाय कुणी नाही. माणूस हा जन्मताच अनामिक भयाने रडतो. मरेपर्यंत भय, अभयाच्या दोन बाजू त्याच्या जीवनाच्या नाण्याला चिकटतात. अभयात सुखाचा तर भयात दु:खाचा भोग त्याला भोगावाच लागतो. भय येतं कुठून? निसर्ग, प्राणी, खानपान रोग, भोग, धनातून जनातून, मनातून आभाळ व भूमीतून, खरं भय माणसाचंच आहे. याच्या भायाने सर्व जग व्यापलं आहे. पशूपक्षी घातक हत्यारं बनवत नाहीत. कपट नाही. विश्वयुद्ध करीत नाहीत. वृक्षतोड, नद्यांचं गटार करत नाहीत. हवा, ध्वनिप्रदूषण, भेसळ, खोटी नाणी, त्यानेच केली, आंबे खराब केले. कृत्रिम दूध, दूषित भाज्या अशा अनेक भयाच्या जागा निर्माण केल्या. माणसाला ज्या वस्तूंची प्रीती होती त्यात माणसानेच भीती मिसळली. माणसानेच पदार्थात भीती घातली. औषधीची भीती. शिक्षणाची भीती. ही भीती मानवनिर्मित आहे. हाच अधर्म आहे व ती नष्ट करणे हाच धर्म आहे.
अभयात दु:खालाही सुखाची चव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 06:24 IST