- विजयराज बोधनकरभारतात असा एक मोठा समाज आहे. परीक्षेचे गुण भरपूर मिळविलेत; परंतु जीवन मूल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी रुची दाखविलीच नाही. भारतीय तत्त्व हे वैश्विकच आहे; परंतु त्याला चिंतनाच्या आणि मननाच्या पायरीपर्यंत कधी येऊच दिले नाही. पोथ्या, पुराण, मंत्रजप, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे फक्त कर्मकांडापुरतेच वाचले गेलेत. ज्यांनी त्याचे अर्थ अनुकरणात आणलेत त्यांच्या जीवन प्रवासाला नक्की ऊर्जेची गती मिळाली; पण ज्यांनी फक्त देव्हारे सजविले, फुलविले आणि फक्त कोऱ्या मनानेच फक्त भक्तिभाव समर्पित केला त्यांना त्याच्या भविष्याच्या कोºया कागदावर यशाच्या प्रश्नांची उत्तरेच लिहिता आली नाहीत. वारकरी संप्रदायात हरिपाठाला फार मोठे महत्त्व आहे. त्या हरिपाठात देव नावाचीसुद्घा अमूर्त शक्ती आणि मानवी सकारात्मक कर्माच्या गुपितांची उत्तरे मात्र नक्कीच दिली आहेत. टाळ, मृदुंगासोबत हरिपाठाचे गायन झाले; पण त्यातले तत्त्व समजून न घेतल्यामुळे वैचारिक श्रीमंती हरिपाठातच पडून राहिली. उदाहरणासाठी हरिपाठाच्या पाचव्या अभंगात तिसरा श्लोक जरी बघितला, तरी त्यात एक मोठे समाजभान दडले आहे. त्याचा सरळ साधा अर्थ इतका प्रभावी आहे की ते वाचून असे वाटते की, हरिपाठ ही धार्मिक भावरचना नसून, हरिपाठ ही शैक्षणिक रचना आहे, जी मानवाला विकासाकडे नेण्यासाठीच निर्माण केली आहे. त्या श्लोकांत असे म्हटले आहे की,तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।गुजेवीण हित कोण सांगे ।।३।।याचा साधारण अर्थ म्हणजे, तपश्चर्येशिवाय देव नावाची ऊर्जा प्रसन्न होत नाही. गुंतवणुकीशिवाय नफा मिळत नाही. स्वत:चा कमीपणा स्वत:च्या गुरूजवळ व्यक्त जर केला नाही तर आत्मोन्नती होणे शक्य नाही.हरिपाठातल्या दोन ओळींचा विचार इतका प्रभावी आहे. संपूर्ण हरिपाठात कितीतरी जीवन उद्देशाची गुपिते दडलेली आहेत. येणाºया नव्या पिढीला याचा इंग्रजीतून अर्थ सांगितला तर नक्कीच आपल्या ग्रंथाकडे वैज्ञानिक ग्रंथ म्हणून पाहिला जाईल. आजची पिढी इंग्रजीची चाहती आहे. त्यांना नव्याने हे सारे सांगायला हवे, विठ्ठल हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो वैश्विक नायक आहे. हे सांगण्याची वेळ नक्कीच आली आहे. वैश्विक स्पर्धेच्या युगात आपले तत्त्वज्ञान जे लाल कपड्यात बांधून ठेवलेय त्याला अभ्यासासाठी मुक्त केलेच तर त्याचा सार्वभौम उपयोग होऊ शकतो.
अभ्यासूनी हरिपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:02 IST