Straight ... or left? | सरळ... की डावीकडे?

सरळ... की डावीकडे?

- धनंजय जोशी
आपल्यापैकी जे गाडी चालवतात, त्यांना हे शब्द माहीत असतील - ‘बॅक सीट ड्राइव्हर’! म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला असतो तोच सगळे ड्रायव्हिंग करतो. इकडे जा, इकडे डावीकडे, इकडे उजवीकडे, इकडे सरळ.. माझ्या पत्नीने ही जबाबदारी अगदी उत्साहाने उचलली आहे. माझे झेन गुरु सान सा निम म्हणायचे, ‘सगळ्यात मोठा बॅक सीट ड्राइव्हर म्हणजे आपले मन! आपण आपले आयुष्य जगताना हा बॅक सीट ड्राइव्हर कायम काही ना काहीतरी सांगत राहातो.. हे करू नको, हे चांगले, हे वाईट, हे आवडले, हे नाही आवडले! आपल्या प्रत्येक क्रियेबाबत ह्या बॅक सीट ड्राइव्हरला आपले मत सांगायचे असते. झेन साधना म्हणजे ह्या बॅक सीट ड्राइव्हरला शांत करणे. ह्या बॅक सीट ड्राइव्हरची मते येतात तरी कुठून? त्याला सान सा निम म्हणायचे, ‘चेकिंग माइंड’ - म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपणच न्यायाधीश मानणारे मन! हा बॅक सीट ड्राइव्हर सगळीकडे आपल्या पाठीवर बसून आपल्याला न समजता आपले आयुष्य घडवत असतो. ह्याच्यापासून सुटका करून घेणे हे झेन साधनेचे काम !
सान सा निम यांची एक आवडती शिकवण होती : ते म्हणायचे, ‘धनंजय, ओन्ली गो स्टेÑट! - फक्त सरळ जा!’ आता हे वाटते सोपे; पण आचरणात आणणे फार कठीण! त्याचा अर्थ तर समजायला पाहिजे! सरळ जाणे म्हणजे कोणतीही शंका न येता क्रिया करणे!
सान सा निम यांना मी माझ्या गाडीमधून कुठे कुठे नेत असे. शिकागोमधले नसले तरी त्यांना सगळे रस्ते माहीत होते त्यामुळे त्यांच्यामधला बॅक सीट ड्राइव्हर चांगला उत्साही होता. असेच एकदा आम्ही त्यांच्या एका भक्ताकडे चाललो होतो. नेहमीप्रमाणे ‘इथे डावीकडे, इथे उजवीकडे’ चालले होते. एका सिग्नलला मला म्हणाले, ‘ओन्ली गो स्टेÑट!’ मी म्हणालो, ‘मला वाटते इथे डावीकडे वळायचे आहे!’ ते हसून म्हणाले, ‘अरे जेव्हा मी म्हणतो सरळ जा, त्याचा कधी कधी अर्थ म्हणजे डावीकडे जा!’- झेन गुरूंच्या शब्दांकडे वेगळंच लक्ष द्यायला लागतं!

Web Title: Straight ... or left?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.