समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म. भगवंताचे नाम हे स्थिर आहे; पण रुप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररुप हे काही रुप नव्हे. जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रुपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही. म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूननच जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येता की, जगात कुठे सुख, समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय योग्य नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाही त्याचे नावच कसे निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते. यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीत सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दु:खाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. याचा अर्ज असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेत. पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते. भगवंताचे होण्याकरीता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे.वेदांतचार्य श्री राधेराधे महाराज, बर्डेश्वर संस्थान, तरवाडी, बुलडाणा
भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:36 IST