It gives happiness who is similar to us and gives unhappiness which is over comes | जे स्वरुपगत आहे ते सुख देते तर आगंतुक आहे ते दु:ख देते
जे स्वरुपगत आहे ते सुख देते तर आगंतुक आहे ते दु:ख देते

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगातील यच्चयावत प्राणीमात्राला सुखच आवडते, दु:ख कुणालाही नको असते. संत म्हणतात- 
मजलागी दु:ख व्हावे । ऐसे कोणी भाविना जीवे ॥ 
आपल्याला तरी सुख का आवडते..? आणि दु:ख का आवडत नाही..? याचे कारण संत सांगतात, मुळात जीव हा सुखरुपंच आहे म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. जे स्वरुपगत असते ते आवडते व जे आगंतुक असते, ते नको वाटते. सुख स्वरुपगत आहे, दु:ख आगंतुक आहे, म्हणून प्रत्येकाची धाव सुखाकडेच आहे. आपल्या मूळच्या स्वरुपाकडेच प्रत्येकाची धाव आहे. दु:ख का जावे वाटते..? तर ते आगंतुक आलेले असते. पाहुणा कितीही चांगला असला तरी तो किती दिवस घरात राहावा वाटतो..? व मुलगा कसाही असला तरी घरातून जावा, असे वाटते का..? कारण काय तर मुलगा हा स्वरुपगत आहे व पाहुणा हा आगंतुक आहे. स्वरु पगत आहे ते राहिलेच पाहिजे व आगंतुक आहे ते गेलेच पाहिजे. याचे कारण स्वरुपगत आहे ते सुख देते व आगंतुक आहे ते दु:ख देते. हा जीव परमेश्वराचा अंश आहे व परमात्माच सुखरु प आहे. संत म्हणतात 
सुखरुप ऐसा दुजा कोण सांगा ।
माझ्या पांडुरंगा सारिखा तो ॥

म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. दु:ख हे आगंतुक आलेले आहे, ते नको वाटते. वेदांतशास्त्रात एक उदाहरण आलेले आहे. साळू नावाचा एक प्राणी असतो. या प्राण्याच्या अंगावर दाभणाएवढे मोठे काटे असतात. शत्रूपासून वाचण्याकरिता परमेश्वराने केलेली ती व्यवस्था आहे. त्या साळूवर एखाद्याने आक्र मण केले की तो आपले शरीर फुगवतो मग ते अंगावरचे काटे बाणासारखे सुटतात व समोरच्या प्राण्याला इजा करतात. असा हा अंगावर काटे असणारा प्राणी अरण्यात फिरतांना टाचणी एवढा काटा जरी याला रु तला तरी त्याला तो सलत राहतो. टाचणीएवढा काटा शरीरातून जावा वाटतो व दाभणाएवढा काटा शरीरावर राहावा वाटतो कारण काय तर, स्वरु पगत असते ते राहावे वाटते व आगंतुक आलेले जावे वाटते.

एखादा नास्तिक देव मानणार नाही परंतु त्याला सुख हवे वाटते आणि दु:ख नको वाटते. पण सुख पाहिजे म्हणून ते मिळणार नाही आणि दु:ख नको म्हणून टळणार नाही. त्यासाठी कर्म चांगले करावे लागेल. सुख आणि  दु:ख आपल्याच कर्माचा भोग आहे. या जगात जिथे सुखाची प्राप्ती आहे तिथे जीव कधी जात नाही व जिथे दु:ख आहे तिथे गेल्याशिवाय राहात नाही. वाईट कर्माने दु:ख प्राप्त होते. मनुष्य वाईट कर्म केल्याशिवाय राहात नाही व चांगल्या कर्माचे फळ सुख आहे. मनुष्य चांगले कर्म कधी करीत नाही. म्हणून दु:ख कधीही टळत नाही...! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. मोबाईल क्र. 9421344960 )


Web Title: It gives happiness who is similar to us and gives unhappiness which is over comes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.