मन:शांतीचा सुलभ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:42 PM2018-09-11T17:42:19+5:302018-09-11T18:07:59+5:30

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

The easiest way of peace of mind | मन:शांतीचा सुलभ मार्ग

मन:शांतीचा सुलभ मार्ग

Next

अशोकानंद महाराज कर्डिले

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।
मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।२।।
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।३।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।

परमार्थ असो अथवा प्रपंच असो या दोन्ही ठिकाणी एक समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘मन’. मन जर अशांत असेल तर मनुष्य समाधानी राहू शकत नाही. पंचदशीमध्ये म्हटले आहे की, ‘मन एवं मनुष्याणाम् बंधमोक्षयो :।। बंध आणि मोक्ष या दोन्हीसाठी फक्त मनच कारण आहे. दुसरे काहीही नाही.
बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोर।। किती हाकला हाकला। फिरी येतं पिकांवर।। मन मोठे चंचल आहे. म्हणून या मनालाच वळवावयाचे आहे. हल्ली आपल्या आसपास कोठेही बघितले तर माणसे ताण-तणावाखाली जगतांना दिसतात. त्यांना मानसिक शांती नाही. म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचे दवाखाने जास्त दिसू लागले आहेत. कुटुंबात तणाव वाढलेले दिसतात. सर्वत्र तणावाखाली लोक दिसतात, याचे कारण म्हणजे मनाचा कमकुवतपणा ! या मनाला स्थिर करता आले तरच प्रतिकूल स्थितीतही तणाव वाढणार नाही. माणसाचे जीवन सुखमय होईल, यासाठीच जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज फार सुंदर उपाय सांगतात. तो म्हणजे, मनाला प्रसन्न करा. मन जर प्रसन्न असेल तर सर्व काही सध्या करता येईल. याचा अर्थ मनाप्रमाणेच वागायचे असे नाही, तर मनाला योग्य दिशा द्यायची. मनाचा स्वभाव असा आहे की,ते ज्या गोष्टीला पाहिलं तिथे ते सोकते. तिकडे ओढ घेते, या करिता काय करावे. मनाला अध्यात्म मार्गाकडे न्यावे. त्याला ध्यान, चिंतनाची थोडी सवय लावावी. मन:शांती मिळण्याचा अध्यात्म हा एक चांगला मार्ग आहे.
सुख, समाधान मनाच्या प्रसन्नतेमुळेच मिळते. मनानेच प्रतिमा स्थापित केली व मनानेच पूजा कल्पिली. मनोमय पूजा हेचि पढिये केशिराजा ।।तु. म. ।। मानसिक पूजा भगवंताला आवडते. बहिरंग केलेली पूजा सुद्धा देवाला आवडत नसते. म्हणून हे मनच माउली आहे. मनाला माउली म्हणणारे तुकाराम महाराज एक वेगळे संत आहेत. गुरु आणि शिष्य सुद्धा आपले मनच आहे. कारण सर्व क्रियेचे साक्षी मनच असते. जर मन प्रसन्न असेल तरच आपली प्रगती होते आणि अप्रसन्न मन अधोगतीला कारण ठरते. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, साधक, विद्वान, वक्ते, पंडित, कोणीही असा पण, एक लक्षात घ्या,या मनासारखे दुसरे दैवत नाही. संत तुकाराम महाराजांनी मनाचे थोडक्यात आणि यथार्थ विवेचन व निदान केले आहे. हाच एक मन:शांतीचा सुलभ मार्ग आहे.

( लेखक भागवताचार्य असून अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील चिचोंडी पाटील येथे  गुरुकुल भगवंताश्रम ते चालवितात.)

 

Web Title: The easiest way of peace of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.