- प्रा. शिवाजीराव भुकेलेयोग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे यालाच योग्य प्रशासन संबोधले जाते. ज्या व्यक्तीची योग्यता व मर्यादा संबंधित कार्यासाठी योग्य नसतील तर कार्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. गुणवत्तेच्या संकल्पनेस आपोआपच ओहोटी लागते, हे सत्य जसे व्यवहारात महत्त्वपूर्ण आहे तसे ते पारमार्थिक क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. अधिकारी पुरुषाने अधिकारी साधकास त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन उपदेश केला तर स्वानंद सुखाच्या लहरी निर्माण होऊ शकतात. उपदेश देणाऱ्यांनी प्रथम आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्यावी. दिव्याखाली गाडाभर अंधार अन् दुसऱ्यांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करणाºयांची अवस्था लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी होते. तेव्हा उपदेश देणारा श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असावा तर ऐकणारा विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्वाने युक्त असावा तरच ज्ञानाचे संचरण ‘ये हृदयीचे ते हृदयी’पर्यंत होऊ शकते. कठोर पाषाणावर पर्जन्य कितीही कोसळला तर त्यातून धन-धान्याची निर्मिती होऊ शकत नाही. तद्वत क्रोधी, अविश्वासी, चंचल माणसाच्या डोक्यावरून उपदेशाच्या कितीही गंगा वाहिल्या तरी त्यांचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. म्हणून तुकोबांसारख्या लोकशिक्षकाने पारमार्थिक अधिकार भेदाच्या पायºया लक्षात घेऊन सांगितले होते -अधिकार तैसा करू उपदेशसाहें ओझे त्यास तेची देऊ ।मुंगीवरी भार गंजाचे पालनघालीता ते कोण कार्यसिद्धी ।तुका म्हणे फासे वागुरा कुºहाडीप्रसंगी ते काढी पारधी तो ॥तुकोबांचा हा अभंग रोजच्या व्यवहारातील एक आदर्श आहे. आपण नेहमीच म्हणतो, ज्याला जेवढे ओझे सहन होईल तेवढाच भार त्याच्यावर टाकावा. जर त्याच्या मर्यादेपेक्षा अधिक भार टाकला, तर तो मध्येच ओझे टाकून रिकामा होतो. मुंगीवर हत्तीचा भार टाकला तर ती चिरडून मरून जाईल. फासे, जाळे, कुºहाडी, भाले, बाण अशी अनेक साधने असली तरी खरा शिकारी एकाच वेळी सर्वच साधनांचा वापर करीत नाही. जशी शिकार असेल तशा व तेवढ्याच साधनांचा वापर तो करतो. आपल्या इच्छेनुरूप शिकार करण्यात यशस्वी होतो तद्वत आपल्याकडे ज्ञानाचे अथांग भांडार आहे. शास्त्र, उपनिषदे, वेद, धर्मग्रंथांचे भांडार आपल्या डोक्यात जरी भरलेले असले तरी ऐकणाºयांच्या डोक्याचा आणि बौद्धिक मर्यादेचा विचार हे ज्ञानाचे भांडार ओतणाºयांनी करायला हवा. आज तर अनेक सत्संगाच्या महामेळाव्यात माया, ब्रह्म, मोक्ष मुक्तीचे डोस पाजले जातात, पण ऐकणाºयास मात्र ते पचत नाहीत. जर एखादी भाकरी जरी भाजायची असेल तर पाणी, अग्नी, पीठ, तवा, काठवट व कुणीतरी भाजणारे ही सर्व साधने एकत्र यावी लागतात तरच भाकरी भाजते. पारमार्थिक अधिकाराची भाकरी भाजायची असेल तर शम, दम, उपरम, तितिक्षा इ. सर्व साधने एकत्र यावी लागतात अन्यथा ‘परस्परम प्रशशंती, अहो रूपं महि ध्वनिम’ अशी अवस्था होते. सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात तरी ‘साहे ओझे त्यास तेचि देऊ’ या तत्त्वाचा जाणीवपूर्वक उपयोग झाला तर अभ्यास झेपला नाही म्हणून विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत. काम जमले नाही म्हणून कामगार निराश होणार नाहीत. व्यवसायात प्रचंड हानी झाली म्हणून व्यावसायिकाचे दिवाळे निघणार नाही, पण हे सारे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रबोधन यात्री तुकोबांचा हा उपदेश कापडात गुंडाळून देवळात ठेवला जाणार नाही, तर शाळा, महाविद्यालयांचे घोषवाक्य आणि व्यावसायिकाचे जीवनसूत्र ठरेल.
Adhyatmik : तैसा करू उपदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 06:58 IST