वणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
By Admin | Updated: April 4, 2017 00:13 IST2017-04-04T00:13:47+5:302017-04-04T00:13:47+5:30
नगरपरिषद वणीकडून रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त कृषी समृद्धी महोत्सव २०१७ अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा....

वणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
वणी : नगरपरिषद वणीकडून रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त कृषी समृद्धी महोत्सव २०१७ अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा ८ ते १३ एप्रिल या कालावधीत वणी येथील रंगनाथ स्वामी यात्रा मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
उद्घाटन ८ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती राहिल, तर १३ एप्रिल रोजी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहतील. दरम्यान महाराष्ट्रातील ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ व अभ्यासकांचे कापूस, सोयाबिन, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, पाणी व्यवस्थापन, अर्थ, नियोजन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन लाभेल. शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल या ठिकाणी असतील. तसेच बँकांचेही स्टॉल असतील. यावेळी बँकेच्या प्रतिनिधींकडून त्या ठिकाणी कर्ज, प्रकल्प अहवाल, योजना, कागदपत्र आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन मिळेल. १२ एप्रिल रोजी पशू प्रदर्शन राहिल. तसेच धान्य महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट विक्री या ठिकाणी होईल. जवळपास दीडशे स्टॉल आतार्यंत बुक झाल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शन व मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. पत्रपरिषदेला आमदार प्रा. राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, नगरसेवक डॉ. महेंद्र लोढा उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)