अनधिकृत बांधकाम थांबवा!

By Admin | Published: April 28, 2017 01:43 AM2017-04-28T01:43:15+5:302017-04-28T01:43:15+5:30

नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी : पालिकेच्या परवानगीविनाच संकुलाचे बांधकाम

Stop unauthorized construction! | अनधिकृत बांधकाम थांबवा!

अनधिकृत बांधकाम थांबवा!

googlenewsNext

कारंजा लाड : नगर पालिका प्रशासनाची परवानगी न घेता शहरात व्यापारी संकुलाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे़ सदर बांधकाम थांबवून त्यावर हातोडा घालावा, अशी मागणी येथील तीन नगरसेवकांनी केली आहे़ यासंदर्भात त्यांनी २६ एप्रिल रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
कारंजा नगर पालिका हद्दीत येणाऱ्या कृष्णा दाल मिल (भारत गॅस गोडाऊनजवळ) कसबे कारंजा नझुल शिट नं. २४ प्लॉट नं. दोनवर अनधिकृतपणे नवीन बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कोणतेही बांधकाम करीत असताना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना नियमानुसार बांधकाम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम डावलून सदर ठिकाणी विनापरवानगी (अनधिकृत) बांधकाम करण्यात येत आहे. अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या रमाकांत उमाशंकर खेतान (रा.चार बंगला, गौरक्षण रोड, अकोला) व सैय्यद जाकीर अली सैय्यद इब्राहीम अली (रा. तीन बंगला, गंगानगर, अकोला) यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम तरतुदीनुसार नगरपालिकेने कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी गुन्हे दाखल करावे व सदर बांधकाम पाडण्यात यावे.
विशेष म्हणजे सदर जागा ‘ब’ सत्ताप्रकारात येत असल्याने तसेच औद्योगिक वापरासाठी आरक्षित असल्याने त्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवून व्यापारी संकुलाचे काम करण्यात येत आहे, असे नगरसेवकांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर नगरसेवक तथा भारिप बमसंचे गटनेता फिरोज छट्टू शेकुवाले, सलीम शे.लालू गारवे व निसार खान नजीर खान यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष यांनाही देण्यात आल्या आहेत.

१८ एप्रिलची वृक्षतोडीची तक्रार प्रलंबित!
औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या जागेवर बांधकामासंबंधी कोणतीही परवानगी न घेता अकोला येथील रमाकांत उमाशंकर खेतान व सैय्यद जाकीर अली सैय्यद इब्राहीम अली हे कृष्णा दाल मिल (भारत गॅस गोडावूनजवळ) कसबे कारंजा नझुल शिट नं.२४ प्लॉट नं.२ येथे अवैधपणे व्यापारी संकूल उभारत आहे. या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ४ हिरव्यागार निंबाच्या विशाल वृक्षांची १३ एप्रिल रोजी त्यांनी कत्तल केली आहे. याबाबत संबंधितांनी नगरपालिका प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार येथील वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य तथा नगरसेवक फिरोज शेकुवाले, सलीम शेख लालू गारवे व निसार खान नजीर खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १८ एप्रिल रोजी केली आहे. ही तक्रार देखील अद्याप ािली काढण्यात आलेली नाही.

व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबत संबंधितांनी नगर परिषदेची कुठलीच रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे काम निश्चितपणे नियमबाह्य ठरते. याप्रकरणी नगरसेवकांची तक्रार प्राप्त झाली असून नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- प्रमोद वानखेडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा लाड

Web Title: Stop unauthorized construction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.