कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणारा बाप आणि मुलगी जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 06:18 PM2019-04-30T18:18:49+5:302019-04-30T18:19:53+5:30
वाशिम : कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया आठ जणांच्या टोळीतील मूख्य सूत्रधार असलेल्या बापास व त्याच्या मुलीस वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कमी पैशात सोने देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया आठ जणांच्या टोळीतील मूख्य सूत्रधार असलेल्या बापास व त्याच्या मुलीस वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी दोघांनाही यवतमाळ एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन पोलिस कर्मचाºयांसह अन्य एका आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आली असून आठपैकी तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, १७ मार्च २०१९ रोजी फिर्यादी रणजीत पांडूरंग गायकवाड (शिरूर जि.पुणे) यांना तीन किलो सोने १४ लाख रुपयात देण्याची बतावणी करून तथा प्रत्यक्षात त्यांना १२.५० लाख रुपयांनी गंडा घातल्याप्रकरणी पोफाळी (जि. यवतमाळ) पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारंजा पोलिस दलात कार्यरत कैलास मंगूसिंग राठोड, मंगरूळपीर पोलिस ठाण्यात कार्यरत मुकेश श्रीराम गौरखेडे या दोन पोलिस कर्मचाºयांसह शिवा कानडे (रा.म्हसणी) अशा तिघांना अटक केली. विशेष म्हणजे वाशिमच्या पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत दोन्ही पोलिस कर्मचाºयांना सेवेतून तडकाफडकी निलंबित देखील केले.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुखदेव पंडित चव्हाण (रा. कारंजा) हा त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाल्यावरून मंगरूळपीर पोलिस दलातील अरविंद सोनवणे यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. सुखदेव चव्हाणची कसून चौकशी केली असता, त्याने रणजित गायकवाड यांना १२.५० लाखांनी लुटल्याची कबूली देण्यासोबतच यातील अन्य आरोपींची नावेही उजागर केली. विशेष गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात त्याची मुलगी सपना सुखदेव चव्हाण हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, बापास व मुलीस ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी यवतमाळ ‘एलसीबी’कडे सोपविण्यात आल्याची माहिती शिवा ठाकरे यांनी दिली.
सुखदेव चव्हाणने पातूर आणि शेगावातील गुन्ह्यांचीही दिली कबूली
सुखदेव चव्हाण व त्याच्या टोळीने रणजीत राठोड यांना १२.५० लाखांनी लुटण्यासोबतच पातूर (जि. अकोला) येथे ७ नोव्हेंबर २०१८ रोजी पवन पांडुरंग कापसे यांची फसवणूक करून ३ लाख रुपये लुबाडले. तसेच शेगाव (जि. बुलडाणा) १८ मे २०१८ रोजी लईक हसन यांची १२ लाख रुपयांनी फसवणूक केली. या दोन्ही गुन्ह्यांची कबूली सुखदेव चव्हाण याने तपासादरम्यान दिली.