सरपंचांनी ‘सील’ केलेले पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या कपाटाचे कुलूप उघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:11 PM2018-01-27T16:11:09+5:302018-01-27T16:14:43+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला.
वाशिम : रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड गायब प्रकरणी सरपंचांनी ग्रामपंचायतीमधील कपाट ‘सील’ केले होते. याप्रकरणाची दखल घेत रिसोड पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकाचा प्रभार तडकाफडकी काढून टाकला.तसेच कपाटाला लावलेले कुलूपही सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. दरम्यान, २६ जानेवारीपासून नवीन ग्रामसेवकांनी प्रभार स्विकारला.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीमध्ये अनियमितता झाल्याने ग्रामसेवकाविरूद्ध कारवाईचे संकेत पंचायत राज समितीच्या पथकाने दिले होते. मात्र, कारवाईची धार कमी करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीमधील महत्वाचे ‘रेकॉर्ड’ गायब झाल्याची तक्रार पार्डी तिखे (ता.रिसोड) येथील गटग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शेषराव दगडू अंभोरे यांनी रिसोड पंचायत समितीकडे केली होती. पंचायत राज समितीच्या पथकाने १४ व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीची माहिती जाणून घेतली असता, त्यात अनियमितता झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाविरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईची धार कमी करण्याचा प्रयत्न सद्या सुरू असून ग्रामपंचायतमधील कपाटातून बँकेचे पासबुक, चेकबुक, प्रोसेडींग बुक, अर्धवट स्वाक्षºया असलेली कागदपत्रे, स्टँम्प आदी साहित्य गायब झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच शेषराव अंभोरे यांनी तडकाफडकी ग्रामपंचायतीमधील कपाटाला सील ठोकून गटविकास अधिकारी अथवा नव्याने रुजू होणाºया ग्रामसेवक आणि पंचाच्या समक्षच सील उघडले जावे, असा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने २५ जानेवारी सायंकाळी रिसोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) पी.डी. लोखंडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमधील ‘सील’ केलेले कपाट उघडण्यात आले. यावेळी ग्रामसेवक आर.एस. शिंदे यांचा प्रभार काढून एस.के. काठोळे नामक ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आला. प्रभार हस्तांतरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतमध्ये संगणक संच तसेच विद्युत मीटरही आढळून आले नाही. ग्रामपंचायतचे पासबुक व चेकबुक ग्राम सचिवांच्या बॅगमध्ये असल्याचे दिसून आले, अशी नोंद विस्तार अधिकारी लोखंडे यांनी घेतली आहे.