वडाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:01 IST2018-01-17T00:00:59+5:302018-01-17T00:01:13+5:30
नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे.

वडाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : नरभक्षी वाघिणीच्या हैदोसामुळे प्रकाशझोतात आलेल्या वडाळा शिवारातील वादळ नुकतेच शमले. आता या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी जंगलात चराईसाठी सोडलेल्या भाकड जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. यात त्याने २ गार्इंचा फडशा पाडला. तर ४ गायी बेपत्ता आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. याप्रकरणी वनाधिकाºयांनी पंचनामा केला आहे.
वडाळ्याचे गुराखी धनराज बऱ्हांणपुरे यांनी गावातील सर्व जनावर गायी, म्हशी, गोरे, कालवड चराईसाठी जंगलात नेले. यातील काही भाकड गायी जंगलातच थांबल्याने सुरक्षित असेल अशी खात्री झाली. मात्र काही दिवसातच बिबट्याने दहशत माजविली असून जनावरांवर हल्ले सुरू केले आहे. गोविंद पोटे, रविंद्र वडस्कर, प्रवीण लावणकर, प्रवीण पोटे, पांडुरंग शिथाले यांच्या गाई बिबट्याने शिकार केल्याचे सांगत आहे. सद्या दोन गाई मृत दिसल्या आहे. चार गार्इंचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एन.वाय. परतेती यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यावरच देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी जंगलातील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरुन शेतात जायला हिम्मत करत नाही. त्यामुळे शेतपिकाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भागातील वनजमिनीवर अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या आहेत. यामुळे या भागात शेतकऱ्यांची वर्दळ असते. अशात याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतक्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांनी या भागात जाणे टाळल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.
वडाळा शिवारात बिबट आहे. शेतकऱ्यांनी जंगलात मुक्कामी व जनावर ठेवू नये. वनरक्षकांची गस्त लावुन संरक्षण देण्याचे काम सुरू आहे.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी(श.)